पुण्यात ‘येलो’ तर जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे | 18 मे 2025: पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहरात ‘येलो’ अलर्ट तर जिल्ह्याला ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हालचालींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळालाय. शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात घट अनुभवायला मिळाली.

हवामान विभागाचा अंदाज:
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या साथीने हलक्यांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभरातही हवामान बदलाचे संकेत:
संपूर्ण महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून, दोन दिवस राज्याला ‘येलो’ अलर्ट दिला गेला आहे. कोकणात 19 व 20 मे, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 21 मे पर्यंत काही भागांत पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पुढील पाच दिवस हवामान अस्थिर राहणार आहे.

घाटमाथ्यावरही पावसाचा इशारा:
पुणे जिल्ह्यासह सातारा, नाशिक, सोलापूर, सांगली, धुळे या भागांच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची शक्यता असून, याठिकाणीही ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

Loading