पुणे । दि. १८ मे २०२५: शहरातील बिबवेवाडी परिसरात मध्यरात्री गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला कट दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला कट दिला. या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि संतप्त झालेल्या आरोपींपैकी एकाने हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, तात्काळ कारवाई करत बिबवेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्यांच्यावर याआधीही विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात आणखी चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पुण्यातील रहदारीच्या वादातून थेट गोळीबार होण्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.