पुणे, २७ मे २०२५: मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाच्या सरींनंतर सोमवारी नैऋत्य मोसमी पावसाने अधिकृतरित्या शहरात प्रवेश केला. हवामानात गारवा निर्माण झाला असला तरी पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी मंगळवारी (२७ मे) ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंदा मान्सूनने पुण्यात नेहमीपेक्षा जवळपास १२ दिवस आधीच हजेरी लावली आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दुपारी सुमारास मध्यवर्ती भागासह काही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडला. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
हवामानाचा पुढील अंदाज:
मंगळवारी (२७ मे) शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (२८ मे) पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून, तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान २९ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस इतके असण्याचा अंदाज आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत नोंदवलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये):
- पाषाण: ३७.२ मिमी
- लोहगाव: २८.८ मिमी
- शिवाजीनगर: २१.६ मिमी
- चिंचवड: २०.५ मिमी
- मगरपट्टा: १४.२ मिमी
- कोरेगाव पार्क: २.५ मिमी
- एनडीए: १.५ मिमी
नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.