पुणे, २७ मे २०२५: शहरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांत वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यातील एक गंभीर दुर्घटना कर्वेनगर परिसरात घडली असून, झाड कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृत तरुणाची ओळख राहुल जोशी (वय अंदाजे २५) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडकडे जात असताना समर्थ पथावर त्यांच्या दुचाकीवर झाड कोसळले. डोक्यावर जोराचा फटका बसल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्घटना अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच राहुल यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, झाड जुने आणि आतून सडलेले होते. सततच्या पावसामुळे ते अशा प्रकारे कोसळले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी संभाव्य धोकादायक झाडांची छाटणी न केल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. महापालिकेच्या दुर्लक्षिततेमुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांची तपासणी, फांद्यांची छाटणी, गटारांची साफसफाई आणि सखल भागांतील नाल्यांची स्वच्छता केली जाते. मात्र यंदा ही कामं पूर्ण झालेली नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याच्या आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.
यंदा नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात नेहमीपेक्षा १२ दिवस आधीच प्रवेश केला आहे. सोमवारी पुण्यासह मुंबई, कोकण, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांत मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या चार-पाच दिवसांत मान्सून राज्यभर पसरणार आहे. दरम्यान, पुढील चार दिवस पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.