ShripadConsultancy

पुणे: घरफोडी करणाऱ्या सराईतास ठोकल्या बेड्या

पुणे (प्रतिनिधी): घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा पथक सहा कडून अटक करण्यात आली आहे. राहुल दगडू शिंदे (वय ३२, रा. पिरंगुट, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा पथक ६चे पोलिस मंगळवारी (दि. २८) गस्त घालत असताना पोलिस अंमलदार नितीन मुंडे यांना माहिती मिळाली की, घरफोडीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील एक आरोपी हा लोहगाव वाघोली रोड जवळील डीमार्ट जवळ उभा आहे. पोलिस पथकासह त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी आरोपी राहुल शिंदे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे वेगवेगळ्या वर्णनाचे एकूण ६ लाख ४० हजार ३२२ रुपयांचे ८७ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोटारसायकल, मोबाईल मिळून ७ लाख ४० हजार ३२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोन्याचे दागिने हे लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याचे ताब्यातील मोटारसायकलही रावेत पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकंदरीत तपासामध्ये घरफोडीचे व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Loading