पुण्यात पहाटे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; दोन आरोपी जेरबंद

पुणे, २७ मे २०२५: देहूरोड परिसरात आज पहाटे एका एटीएम मशीनला गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी सुमारे साडेचार वाजता पाच जणांच्या टोळीने हा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे दोघा चोरांना घटनास्थळीच पकडण्यात यश आलं असून, उर्वरित तिघे चोरटे कारमधून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्याचवेळी पाच अज्ञात चोरटे एटीएम सेंटरमध्ये घुसून गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडण्याचा प्रयत्न करत होते.

पोलिस येण्याआधीच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, धाडस दाखवत काही नागरिकांनी पाठलाग करून दोघांना अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याशिवाय, इतर तीन आरोपी जवळच उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून फरार झाले.

पोलिसांनी घटनास्थळी गॅस कटरसह काही उपकरणे हस्तगत केली असून, अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. त्यांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.

फरार चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. देहूरोड परिसरात गेल्या काही महिन्यांत चोरी आणि दरोड्यांच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पोलिसांनी गस्त वाढवण्याचं आश्वासन दिलं असून, स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या तत्काळ प्रतिसादाचं स्वागत केलं आहे. तसेच, उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

[ajax_load_more]

Loading