पुणे (प्रतिनिधी): शहरातील तापमानामध्ये वाढ झाल्याने थंडी गायब झाल्याचे चित्र होते. किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने पुणेकरांनी थंडीमध्ये उन्हाळ्याचा अनुभव घेतला.
मात्र पुढील दोन-तीन दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये चार अंश सेल्सिअस घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणे शहरामध्ये शनिवारी किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर ३४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून किमान तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे शहरातील थंडी गायब झाली होती. मात्र किमान तापमानामध्ये घट होऊन थंडी वाढणार असल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. मंगळवारी (ता. १०) किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. तर आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.