ShripadConsultancy

पुणे: नियम उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यांचे परवाने रद्द; २९ पेढ्यांवर ‘अन्न व औषध’ची कारवाई

पुणे (प्रतिनिधी): पुण्यात रक्ताचा तुटवडा असताना दुसऱ्या राज्यात रक्ताचा साठा पाठवला जात होता. तसेच रक्तपेढ्यांकडून विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागातील एका रक्तपेढीचा परवाना रद्द केला आहे. इतर २९ रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत, तर ३२ रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर ३ रक्तपेढ्यांवरील कारवाई प्रलंबित असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.

एफडीएकडून पुण्यासह विभागातील सोलापूर, सातारा सांगली आणि कोल्हापूर येथील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ८१ रक्तपेढ्यांची विशेष मोहिमेद्वारे तपासणी केली.

यामध्ये नियम न पाळणाऱ्या रक्तपेढ्यांवर एफडीएतर्फे कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. तर एका रक्तपेढीस स्पष्टीकरण मागवण्याची शिफारस संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात आली आहे.

विभागाकडून एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत परराज्यात पाठविलेल्या रक्त पिशवी व रक्तघटकांची माहिती पुणे विभागातील सर्व रक्तपेढ्यांकडून मागवण्यात आली होती.

रक्तदान हे पवित्र दान आहे. रक्तपेढ्यांनी त्याचे व्यापारीकरण न करता योग्य प्रकारे वापर करावा. रक्ताची साठवणूक व वाहतूक करताना कायद्याच्या तरतुदींचे पालन करावे. यामध्ये दोषी आढळलेल्या रक्तपेढ्यांवर कारवाई केली आहे. – गिरीश हुकरे, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग

Loading