पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले

पुणे। दि. १३ जून २०२५: दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गुरुवारी रात्री शहराला मुसळधार पावसाने झोडपले. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यताही नसताना अचानक रात्री दहानंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पुढील ३ दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

यंदा मे महिन्यातच पावसाने हजरी लावली. मॉन्सूनचे दहा ते पंधरा दिवस लवकर आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. साधारपणे २७ मे नंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली. तब्बल दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे पुण्यात धुवाधार आगमन झाले आहे. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठेमध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविणे भाग पडत होते. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.

Loading