पुणे (प्रतिनिधी): कात्रज परिसरातील एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी पकडले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या तीन अल्पवयीनांसह सहाजणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी चेतन नारायण गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांसह उर्वरित तीन अल्पवयीन मुलांवर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कात्रज गावात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे पथक पाठवून या मुलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिघांना पकडण्यात यश आले. मात्र, तिघे पळून गेले. यश रोहिदास बोरकर (वय १८), प्रसाद राजू कांबळे (१९) आणि आर्यन दत्तात्रय काळे (१८, दोघे रा. अंजनीनगर, गणेश कॉलनी, कात्रज) यांना अटक केली आहे.