Mobile Ad

धनकवडीत मध्यरात्री तिघांचा धुमाकूळ – १८ वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Reading Time: < 1 minute

पुणे | २४ जुलै २०२५: धनकवडी परिसरात मंगळवार, २३ जुलैच्या मध्यरात्री अचानक गोंधळ उडाला, जेव्हा तिघा अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथनगर भागात तब्बल १८ वाहनांची तोडफोड करत त्यांनी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं.

या हल्ल्यात १५ रिक्षा, दोन चारचाकी गाड्या आणि एक स्कूल व्हॅन टेम्पोचा समावेश होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे आरोपी एकाच दुचाकीवरून फिरताना आणि वाहनांवर हल्ला करताना स्पष्टपणे दिसून आले आहेत.

हॉकीस्टीक व दगडांचा वापर:पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी हॉकीस्टीक आणि दगडांचा वापर करत वाहनांच्या काचा फोडल्या. काही नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. एका रहिवाशाची दुचाकीही फोडण्याचा प्रयत्न झाला. याच नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्याने पुढील हालचाल शक्य झाली.

पोलीस यंत्रणा सतर्क: घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त करणारे पोलिस आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोपी रात्रीतच पसार होण्यात यशस्वी ठरले. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते स्वतः सहकारनगर पोलिस ठाण्यातून तपासाचे नेतृत्व करत आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष पथकांमार्फत आरोपींचा शोध सुरू आहे.

गेल्या आठवड्यातही पोलीसांवर हल्ला:धक्कादायक बाब म्हणजे, याच सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात काही आरोपींनी पोलिसांच्या तोंडावर पेपर स्प्रे मारून झटापट केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या वाहन तोडफोडीच्या प्रकारामुळे गुन्हेगारांना पोलिसांची धास्ती राहिलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांनी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली असून, हल्लेखोर लवकरात लवकर गजाआड जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading