पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नदीकाठचे दोन हजार नागरिक स्थलांतरित

पुणे। दि. २० ऑगस्ट २०२५: गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत पवना व मुळशी धरणातून वाढवलेला विसर्ग यामुळे पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, शहरातील नदीकाठच्या वसाहतींमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून तब्बल दोन हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

सोमवारपासून पावसाचा जोर कायम असून पवना धरण शंभर टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने मुळशी व पवना धरणातून अनुक्रमे ३१ हजार ५०० व १५ हजार ७७० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वाढली. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संजय गांधीनगर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, जाधवघाट, किवळे, वाल्हेकरवाडी आदी भागातील नागरिकांना महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले.

पंचशीलनगर व पिंपळे निलख येथील १४ जणांचा समावेश असलेल्या पाच कुटुंबांना जवळच्या शाळेत, तर ४५ जणांचा समावेश असलेल्या १२ कुटुंबांना पिंपळे गुरव येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले. संजय गांधीनगरमधील ७५ रहिवाशांपैकी ३० जण शाळेत गेले असून उर्वरितांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला. चिंचवडगाव, रामनगर बोपखेल, जाधव घाट, वाल्हेकर शाळवाडी, किवळे लेबर कॅम्प व भाटनगर परिसरातील शेकडो नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सकाळ, दुपार व रात्री अशा तिन्ही पाळ्यांमध्ये समन्वय अधिकारी, अभियंते व लिपिकांची नियुक्ती करून पूरस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच धोक्याच्या भागात ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटात मंगळवारी तब्बल ५७५ मिमी पाऊस नोंदवला गेला असून, तो यंदाच्या पावसाळ्यातील एका दिवसातील सर्वाधिक पर्जन्यमान ठरला आहे.

शिफ्टनिहाय नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी

सकाळची शिफ्ट (सकाळी ६ ते दुपारी २)

  • समन्वय अधिकारी – संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१७५८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, सहाय्यक स्थापत्य अभियंता प्रफुल्ल भोकरे, मुख्य लिपिक सुनील चव्हाण, लिपिक गोविंद गर्जे

दुपारची शिफ्ट (दुपारी २ ते रात्री १०)

  • समन्वय अधिकारी – विजय भोजने, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१७६८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता सुनील दांगडे, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता चिन्मय कडू, मुख्य लिपिक मुरगू बोटे, लिपिक शिधाजी जाधव

रात्रीची शिफ्ट (रात्री १० ते सकाळी ६)

  • समन्वय अधिकारी – सुनील पवार, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : ९९२२५०१९४८)
  • सहाय्यक अधिकारी – उप अभियंता शाम गर्जे, कनिष्ठ अभियंता राजदीप तायडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता शेषेराव अटकोरे, मुख्य लिपिक भरत कोकणे, लिपिक विनायक रायते

Loading