पुणे जिल्ह्यात बेकायदा बाईक टॅक्सी सेवेला चाप; परवाना मिळेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचे आरटीओचे निर्देश

पुणे। दि. २७ ऑक्टोबर २०२६: पुणे जिल्ह्यात आवश्यक परवान्याशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संबंधित खासगी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवाना मिळेपर्यंत ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, नागरिकांनी अशा बाईक टॅक्सीमधून प्रवास करू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा करण्यात आली होती. ई-बाईक टॅक्सी चालवण्यासाठी आवश्यक परवाना मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यातील सेवा बंद ठेवण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आले होते. तसेच, परवान्याविना बाईक टॅक्सी सुरू असल्याचे आढळल्यास कंपनीविरोधात पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

मात्र, या निर्देशांनंतरही कंपनीचे बाईक टॅक्सी अ‍ॅप सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने १६ ऑक्टोबर रोजी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित अ‍ॅप बंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे.

खासगी दुचाकी मालकांनाही कारवाईचा इशारा:
आरटीओने केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर खासगी दुचाकी मालकांनाही सावध केले आहे. आपल्या दुचाकीची नोंदणी खासगी बाईक टॅक्सी अ‍ॅपवर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी दुचाकीचा वापर बाईक टॅक्सी सेवेसाठी होत असल्याचे वाहन तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित मालकावर मोटार वाहन कायदा आणि नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी अशा सेवांचा वापर टाळावा आणि कायदेशीर कारवाईची शक्यता लक्षात घेऊन अनधिकृत बाईक टॅक्सीपासून दूर राहावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

Loading

Was this helpful?