
पुणे। ३ नोव्हेंबर २०२५ — सुप्रसिद्ध वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला.
ही कारवाई सरोदेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे करण्यात आली आहे. समितीने सरोदेंच्या भाषणाचे व्हिडिओ व ट्रान्सक्रिप्ट तपासून निष्कर्ष काढला की, त्यांच्या विधानांमुळे न्यायसंस्थेबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आहे.
सरोदेंनी यापूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, त्यांचे वक्तव्य हे रचनात्मक टीकेच्या स्वरूपात होते आणि “फालतू” हा शब्द अपमानार्थ नव्हता. मात्र बार कौन्सिलने ते स्पष्टीकरण ग्राह्य धरले नाही.
सरोदेंची सनद रद्द झाल्याने त्यांना पुढील तीन महिने कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही. या निर्णयावर सरोदे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
![]()
