पुणे (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदीत गुन्हे शाखेकडून १५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
तसेच, सराईतांकडून २५ पिस्तुले आणि ३८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील पाच परिमंडळाच्या हद्दीत १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांत पोलिस ठाण्यांच्या स्तरावर एक हजार ५१३ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच, गुन्हे शाखेकडून दोन दिवसांत ९९० सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत १३ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले. कोयते आणि धारदार हत्यारे बाळगणाऱ्या आरोपींकडून ८१ हत्यारे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
गुन्हे शाखेने केलेली कारवाई – गुन्हा – दाखल गुन्हे – अटक आरोपी:
अवैध पिस्तूल जप्त – २५ – २२-
बेकायदेशीर हत्यार बाळगणे – १३ – १३-
अमली पदार्थ बाळगणे – ११ – २४-
तडीपार – १५ – १०-
जुगार – १६ – ११४-
वाहन चोरी – ५ – ६-
कॉपी राइट – २ – २-
जीवनावश्यक वस्तू – २ – ३-
प्रतिबंधात्मक कारवाई – १६३ – १९०-
सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ – १२० – १२१-
फरार आरोपी – १४ – १५.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करू नये. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर